हजारो रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
शहापूर – शहापूर तालुक्यातील किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राची श्रेणीवाढ करून ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव २०२२ पासून मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्याने हजारो रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्व सुविधानीयुक्त प्रशस्त इमारत, वाढती रुग्णसंख्या, आवश्यक निकषांची केलेली पूर्तता आणि शहापूरच्या ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाण असतानाही किन्हवलीला ग्रामीण रुग्णालय व त्यानुषंगाने सर्व वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शहापूर तालुक्यातील आदिवासीबहुल पट्टा असलेल्या किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नांदगाव, खरीवली, मुगाव, अस्नोली, अल्याणी या उपकेंद्रांचा कारभार चालतो. किन्हवली प्रा. आरोग्य केंद्रात सुमारे २६,०८७ इतकी लोकसंख्या येत असून परिसरातील ५५ ते ६५ गावांतील नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी किन्हवलीत येत असतात. एकट्या किन्हवली गावाची लोकसंख्या ७ हजार ४४९ इतकी असून दुर्दैवाने किन्हवलीत एकही चांगले व सुसज्ज रुग्णालय नसल्याने रुग्णांना पुढील उपचारांसाठी शहापूर, मुरबाड किंवा कल्याण येथे जावे लागते. आर्थिकदृष्ट्या अक्षम असलेल्या शेकडो नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
२०२१ मध्ये ४ कोटी २५ लक्ष रुपये खर्च करून किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मुख्य रुग्णालय इमारतीसह अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. २०२२ मध्ये माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेऊन किन्हवली प्रा. आरोग्य केंद्राच्या श्रेणीवाढीची मागणी केली होती. १ जुलै २०२४ मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे यांनी प्रस्तावातील सर्व त्रुटी दूर करून सुधारित प्रस्ताव मंत्रालयात सादर केला होता. मात्र त्यानंतर कोणतीही हालचाल झाल्याची माहिती उपलब्ध नाही. किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्र हे शहापूर-मुरबाड-नगर राज्यमार्गावर असून या आरोग्य केंद्राकडे मुख्य रस्त्याच्या बाजूलाच सुसज्ज दवाखाना इमारत, अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने असून किन्हवली तलाठी सजेतील सर्वे क्र. २६/४/२/क/२ मधील ०-१५-८ हे.आर. ही जमीन डीलो दवाखाना या नावाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावावर आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज ३०० ते ४०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेत असून विविध प्रकारच्या तपासण्या येथे केल्या जातात. मात्र गंभीर आजार, तातडीचे पुढील उपचार यांची सोय नसल्याने यांसाठी गोरगरीब
नागरिकांना २६ किमी अंतरावर असलेल्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात जावे लागते. त्यासाठी वेळ व प्रवासासाठी पैसे खर्च करावे लागत असल्याने रुग्णांची हेळसांड होत असते. मात्र किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राला श्रेणीवाढ देवून त्याचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर केल्यास हजारो ग्रामीण रुग्णांना फायदा होणार
आहे. लालफितीत अडकलेल्या या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी किन्हवलीकरांकडून केली जात
असून त्यासाठी किन्हवली तालुका निर्मिती समन्वय समिती मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.


