कर्जत तालुक्यामध्ये आगामी ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हारे ग्रामपंचायतीत राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र गोमारे यांनी रक्षाबंधन सणानिमित्त तब्बल १२०० महिलांना एकत्र आणत अनोखा उपक्रम राबवला. या सामाजिक उपक्रमाची जोरदार चर्चा सध्या परिसरात सुरू असून, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक २ मधून शिवसेना (शिंदे गट) कडून गोमारे हे प्रमुख उमेदवार असतील, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
मागील ग्रामपंचायत निवडणुकीत नरेंद्र गोमारे यांना अवघ्या ६ मतांनी निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, या पराभवाने खचून न जाता त्यांनी गेल्या काही वर्षात कोल्हारे परिसरात सातत्याने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मदतकार्याचे उपक्रम राबवून थेट जनतेशी संपर्क कायम ठेवला. या सातत्यपूर्ण समाजकार्यामुळे त्यांनी नागरिकांच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.
सध्या कोल्हारे ग्रामपंचायतीतील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले पाहायला मिळत आहे. गोमारे यांचा वाढता जनसंपर्क, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर धावून जाण्याची वृत्ती आणि सामाजिक उपक्रमांचा धडका यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना याचे किती मोठे यश मिळते, याकडे संपूर्ण ग्रामपंचायतचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळचा अत्यंत अल्प मतांचा पराभव आणि त्यानंतर उभारलेला भक्कम जनसंपर्क पाहता, येणारी निवडणूक नरेंद्र गोमारे यांच्यासाठी नवी राजकीय दिशा ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


