येऊर मधील आदिवासी पाड्यांतील विद्यार्थी व पालकांसाठी कायदेविषयक जनजागृती व सरकारी शैक्षणिक योजनांबाबत विशेष माहिती सत्र संपन्न

yeor adivasi educational program

विद्या प्रसारक मंडळाच्या टी.एम.सी. लॉ कॉलेज मधील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी ठाणे येथील येऊर भागातील पालकांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकाराबाबत व सरकारी शैक्षणिक सुविधांबद्दल माहिती दिली.
ठाण्यातील येऊर वनक्षेत्रातील आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नुकतेच एक विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. तेथील हेमंत जाधवही कार्यक्रमास उपस्थित होते.
या सत्रादरम्यान विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध शैक्षणिक योजना जसे की शिक्षणाचा अधिकार (RTE ACT 2009), पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप (PMS-SC) योजना, पीएम यशस्वी (PM YASASVI) योजना, खेलो इंडिया (Khelo India) योजना, आणि विधी सेवा प्राधिकरण कायदा १९८७यांबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यात आली. तसेच मुलींना अजूनही काही ठिकाणी, विशेषतः आदिवासी पाड्यांमध्ये व ग्रामीण भागात शिक्षणासाठी शाळेमध्ये अथवा महाविद्यालयात पाठविले जात नाही, त्याकरिता मुलींना शिकवले पाहिजे, त्यांचा तो हक्क आहे तो त्यांना आपण दिला पाहिजे व त्यासाठी सरकार मुलींना जास्तीत जास्त शैक्षणिक सवलती देत आहे, याबाबत पण जनजागृती करण्यात आली. भारतीय संविधानात नमूद केलेल्या कलम ५१ अ च्या अंतर्गत पालकांची कर्तव्येही त्यांना समजावण्यात आली.
मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी एका पथनाट्य बसविण्यात आले जे टीएमसी लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनी असलेल्या श्रीमती वंदना हिरे यांनी लिहिले होते, नाव होते ‘हवेतल्या रेघोट्या, खरे शब्द झाले’. येऊरच्या दुर्गम भागात जाऊन विद्यार्थिनींनी हे सत्र यशस्वीरीत्या पार पाडले. केतकी गोगटे यांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची रूपरेषा व सर्व योजनांबाबत थोडक्यात माहिती सांगितली. सौ. वंदना हिरे यांनी शिष्यवृत्ती योजनांबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवले.
सौ. रेणू कचरे यांनी शिक्षणाच्या अधिकाराबाबत जनजागृती केली आणि त्यानंतर श्रद्धा ठाकरे यांनी विधी सेवा प्राधिकरण कायद्याविषयी माहिती देत मोफत कायदेशीर सल्ल्याबाबत सुविधांवर प्रकाश टाकला. टीएमसी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी पाड्यातील मुलांना इंग्रजी विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी त्यांना इंग्रजी भाषेतील काही गोष्टींची पुस्तके भेट दिली. तसेच हेमंत जाधव यांनी टीएमसी लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनींना एक वारली कलाकृतीची फोटो फ्रेम भेट दिली
निष्कर्ष आणि पुढील पावलेः- सत्रादरम्यान असे दिसून आले की, दुर्गम भागात अजूनही अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना या महत्त्वपूर्ण शासकीय योजनांची पूर्ण माहिती नाही. माहितीच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी त्यांच्या मूलभूल हक्कांपासून व शिष्यवृत्ती सवलतींपासून वंचित राहतात. या सत्राचा मुख्य उद्देश ही माहितीची दरी मिटवणे हा होता. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना यासंबंधी काहीही मदत अथवा कायदेशीर सल्ला आवश्यक असल्यास टी एम सी लॉ कॉलेज येथे तो त्यांना मोफत देण्यात येईल असेही टी एम सी लॉ कॉलेज च्या विद्यार्थिनींनी सांगितले. आयोजकांची प्रतिक्रिया :-
आदिवासी भागातील मुलांमध्ये बुद्धिमत्तेची कमतरता नाही, पण त्यांना सरकारी योजनांची योग्य माहिती वेळेत मिळत नाही. पीएम एससी, ‘पीएम यशस्वी’, ‘खेलो इंडिया’, सारख्या योजनांचा लाभजर येऊरच्या मुलांना मिळाला, तर ते देशाच्या पातळीवर चमकू शकतात. शिक्षणाचा अधिकार प्रत्येक बालकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने राबवण्यात आलेले हे सत्र येऊरच्या शैक्षणिक विकासाला एक नवी दिशा देईल, असा विश्वास हेमंत जाधव यांनी व्यक्त केला. शिक्षणाची कास धरुया, समृध्द भारत घडवूया !’

Scroll to Top