आदर्श विकास मंडळाचा ४२ वा वर्धापनदिन उत्साहात

आदर्श विकास मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात

डॉ. कविता लघाटे यांना मानाचा ‘कर्मवीर पुरस्कार’ प्रदान

येथील नामांकित शैक्षणिक संस्था आदर्श विकास मंडळाचा ४२ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. बी. बी. मोरे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून या सोहळ्यात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या मंगलप्रसंगी शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या अधिष्ठाता तथा जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका मा. प्रा. डॉ. कविता लघाटे यांना मान्यवरांच्या हस्ते यंदाचा मानाचा कर्मवीर पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले.
राष्ट्रीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण आदर्श विकास मंडळाच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही यावेळी संपन्न झाला. “विकसित भारत २०४७ – शाश्वत विकास” या विषयावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा आदी विविध राज्यांतून तब्बल ५५७ स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला.
प्रथम पारितोषिकः ५,०००/-, सन्मानचिन्हव प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिकः १३,०००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिकः ₹१,५००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ पारितोषिकेः प्रत्येक भाषेमध्ये ₹१,०००/- ची प्रत्येकी ३ बक्षिसे देण्यात आली.

शिक्षकाचा सत्कार व मंगळागौरीचे सादरीकरण
संस्थेच्या बाल विद्या मंदिर शाळेतील निवृत्त शिक्षकांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा व बहुमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला. संस्थेच्या सर्व विभागांतील महिला शिक्षकांनी पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तत्पूर्वी वर्धापनदिनानिमित्त श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास अतिथी म्हणून आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवीताई नाईक, शिक्षण अधिकारी देविदास महाजन, ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे, डॉ. गणेश भगुरे, डॉ. नरेंद्र पाठक, सी.ए. संजीव ब्रम्हे, अरविंद जोशी, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, नगरसेवक अमित सरैय्या, डॉ. जे.बी. भोर, माजी सिनेट सदस्य महादेव जगताप, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मीरा कोर्डे, सामाजिक कार्यकर्ते पप्पूशेठ सिंग, विनर बिंद्रा, डॉ. अभिजित पांचाळ, नगरसेविका उषा वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे, उपाध्यक्ष मनोज शिंदे, सचिव संतोष शिंदे, विश्वस्त श्रीमती संगीता मोरे, कार्यकारी विश्वस्त सौ. श्रद्धा मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिलकुमार सिंग यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top