बाप्पाच्या आसनाला महागाईची झळ ऑनलाइन बाजाराने कारागिरांची विक्री घटवली !

बाप्पाच्या आसनाला महागाईची झळ ऑनलाइन बाजाराने कारागिरांची विक्री घटवली !

गणेशोत्सवासाठी नाशिक-सिन्नरचे पाट-चौरंग विक्रेते भिवंडीत दाखल

गणरायाच्या स्वागताची लगबग सुरू होताच बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणारे लाकडी पाट, चौरंग आणि पोलपाट भिवंडीच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. मात्र, वाढती महागाई आणि ऑनलाइन खरेदीच्या वाढत्या प्रचलनामुळे पारंपरिक कारागिरांच्या व्यवसायाला यंदा दुहेरी फटका बसत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नाशिक-सिन्नर परिसरातील कारागीर भिवंडीत येऊन पाट, चौरंग आदी वस्तूंची विक्री करतात. यंदाही शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या उपजिल्हा रुग्णालयालगत उड्डाणपुलाखाली त्यांनी आपला व्यवसाय थाटला आहे. विविध आकारांचे आणि आकर्षक नक्षीकाम केलेले पाट व चौरंग नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मात्र, यंदा पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे भिवंडीत ये-जा करण्याचा खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर झाला आहे. गेल्या वर्षी सुमारे १५० रुपयांपासून मिळणारा गणपतीचा पाट यंदा २५० रुपयांपासून उपलब्ध आहे. आकार, लाकूड आणि नक्षीकामानुसार पाटाचे दर ५०० ते ७०० रुपयांपर्यंत आहेत. चौरंगाचा दर २०० वरून २५० रुपये, छोट्या पाटाचा ५० वरून ८० रुपये, तर पोलपाटाचा दर २०० वरून २५० रुपये झाला आहे.
भाव कमी करून खरेदी पाट-चौरंग खरेदीसाठी येणारे अनेक नागरिक कारागिरांकडे कमी भाव करीत असल्याचे चित्र आहे. त्यातच ऑनलाइन बाजारपेठेत विविध वस्तू घरपोच मिळत असल्याने प्रत्यक्ष विक्रीवर परिणाम होत असल्याचे कारागिरांनी सांगितले. पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाने कारागिरांकडे लक्ष देऊन प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी चौरंग पाट विक्रेते अमित पवार यांनी केली आहे.

Scroll to Top