भारताचे आदर्श नागरिक होऊ यात-न्या. अभय ओक

न्या. अभय ओक

डझनभर शाखांच्या माध्यमातुन श्री आनंद भारती समाज, ठाणे ही शतायुषी सेवाभावी संस्था अखंडीत कार्यरत आहे. एका शैक्षणिक उपक्रमाचा अमृत महोत्सव या यशदायी व्यासपीठावर होत आहे. देशातील विद्यमान सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती चिंताजनक आहे. श्री आनंद भारती समाजाने वेळेची शिस्त, वैद्यानिक दृष्टिकोन, देशाच्या घटनेचा आदर, पर्यावरणाची कास धरुन भारताचे नागरिक घडवावेत असे आवाहन न्या. अभय ओक यांनी संस्था चालकांना केले.
श्री आनंद भारती समाजाने ११६ व्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून संस्थेच्या सभागृहात ७५ व्या नाखवा स्मारक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना न्या. अभय ओक बोलत होते.
न्या. अभय ओक म्हणाले, संस्था दोन गोष्टींसाठी कौतुकास पात्र आहे. गेली तीन वर्षे संस्था पर्यावरण पुरक गणेश विसर्जन करत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या पंक्तीत व्यासपीठावर स्मारक पारितोषिक विजेत्यांना स्थानापन्न करण्याचा पायंडा. हे मी प्रथमच अनुभवत असलो तरी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून होत असलेला हा उपक्रम मला भावला.
श्राग्वी बर्वे दहावी शालांत परीक्षेत ९८.२० टक्के गुणांसह ठाणे केंद्रात सर्वप्रथम आल्याबद्दल तिचा ७५ वा यशवंत नाखवा, तर याच परीक्षेत ९४.०० टक्के गुण मिळवून संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांत प्रथम आल्याबद्दल भार्गव कोळी याला ७४ वे दगडू पांडू नाखवा स्मृती पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी गत शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या ८० जणांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. स्वराली नाखवा हिने प्राथमिक स्वरूपात सत्कारास उत्तर दिले. संस्थेचे सचिव संदिप कोळी यांनी अहवाल वाचन केले. ओंकार वैती आणि सुयश कोळी यांनी परिचय करून दिला. सहसचिव माधुरी कोळी हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी समाजाध्यक्ष हरेश्वर मोरेकर, कार्याध्यक्ष ओमप्रकाश धिरोलिया, उपाध्यक्ष विनोद नाखवा व्यासपीठावर उपस्थित होते.

Scroll to Top