रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती डोळखांब येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवार, दि. २१ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कर्मवीरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोर समाजसेवक सन्माननीय जगे काका होते. लेखक व केंद्रप्रमुख सन्माननीय नागु वीरकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. कुगर कंपनी, कलम गावचे जनरल मॅनेजर सन्माननीय संपत शेंडगे तसेच रयतसेवक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर हरणे सर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
प्रमुख वक्ते नागु वीरकर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा व सामाजिक योगदानाचा आढावा घेतला. ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हा कर्मवीरांचा विचार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे संपत शेंडगे यांनी शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी आपल्या खडतर जीवन प्रवासातील विविध अनुभवही विद्यार्थ्यांसमोर मांडले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर हरणेसर यांनीही उपस्थितांना अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला रायगड विभाग समन्वय समितीचे सदस्य, विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन तथा स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य विकासभाई चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूरचे सभापती तथा स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री. नंदुशेठ डोहळे, हेदवली गावचे पोलीस पाटील तथा स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रामचंद्र फर्डे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत अधिकारी, जयराम सोगीर, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. जी. पाटील सर, साकुर्ली गावचे पोलीस पाटील जगदीश भोईर, पत्रकार अतुल भोईर यांच्यासह ग्रामपंचायत डोळखांबचे सदस्य, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य, माजी विद्यार्थी संघ, शिक्षक-पालक संघ, गुरुकुल शिक्षक-पालक संघ, डोळखांब पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोळखांब येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी



