कल्याणमध्ये श्रीसदस्यांकडून १५ हजार किलो निर्माल्य संकलित

कल्याणमध्ये श्रीसदस्यांकडून १५ हजार किलो निर्माल्य संकलित

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांच्या वतीने यंदाही कल्याण परिसरात पर्यावरणपूरक निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. गणेशमूर्ती विसर्जनाच्या दीड दिवस, सात दिवस आणि दहा दिवसांच्या कालावधीत विविध विसर्जन घाटांवरून तब्बल १५ हजार किलो निर्माल्य संकलित करण्यात आले.
नांदिवली, गणेश घाट-दुर्गाडी, नवीन गणेश घाट-कोनगाव, गौरीपाडा तलाव, पाचवा मैल-कांबा, रिजेन्सी अँटिलिया-म्हारळ, टिटवाळा नदी परिसर तसेच गांधारी ब्रिज घाट आदी ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी प्रतिष्ठानच्या ११०० हून अधिक श्रीसदस्यांनी सहभाग घेतला.
संकलित निर्माल्यामधून प्लास्टिक, थर्माकोल, दोरे, काचेच्या वस्तू यांसारखा अविघटनशील कचरा वेगळा करण्यात आला. फुले, दुर्वा आणि पाने यांसारख्या जैविक घटकांपासून शास्त्रोक्त पद्धतीने सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येणार आहे. हे खत पुढे प्रतिष्ठानच्या वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाच्या उपक्रमासाठी वापरले जाणार आहे. गणेशोत्सवानंतर निर्माल्य नदी, तलाव अथवा समुद्रात विसर्जित केल्यामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. श्रद्धेने गणरायाला अर्पण केलेले निर्माल्य पुन्हा सेंद्रिय खताच्या माध्यमातून वृक्षांच्या संवर्धनासाठी वापरले जात असल्याने पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान, निर्माल्य संकलन, वृक्षारोपण व संवर्धन, जलसंवर्धन, रक्तदान, आरोग्यसेवा आणि सामाजिक प्रबोधन असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

Scroll to Top