प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येने ठाण्यात खळबळ

राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा आरोप

राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा आरोप

ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून करण्यात आलेल्या हत्येला राजकीय वळण लागले आहे. पूर्णेकर यांच्या नातेवाईकांनी हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून, पोलिसांनी मात्र सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
२९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रदीप पूर्णेकर हे मानपाड्यातील त्यांच्या कार्यालयात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. दोन गोळ्या लागल्यानंतर जखमी झालेल्या पूर्णेकर यांच्यावर धारदार शस्त्रानेही वार करण्यात आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी मनोरमा नगर, आझाद नगर आणि मानपाडा परिसरात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, तर पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या हत्येत पाच जणांचा सहभाग असल्याचे समोर आले असून त्यापैकी पप्या शिंदे याला अटक करण्यात आली आहे. संतोष कनोजिया उर्फ टल्ली, निखिल यादव उर्फ शूटर यादव, नितेश पवार उर्फ भावड्या आणि आकाश निमसे हे चार संशयित फरार आहेत.
पूर्णेकर यांचे नातेवाईक मंदार घोडके यांच्या तक्रारीनुसार, पप्या शिंदे हा घटनेपूर्वी काही दिवस पूर्णेकर यांच्या कार्यालयात येत होता. घटनेच्या रात्रीही तो कार्यालयात आला होता. त्यानंतर संशयित व्यक्ती कार्यालयाजवळ आल्याचे आणि काही वेळाने गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याचे तक्रारीत नमूद आहे. गोळीबारानंतर पूर्णेकर रक्ताच्या थारोळ्यात आढळले, तर पप्या शिंदे त्यांच्या सोबतच असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, कारवाईच्या मागणीसाठी पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. यावेळी कुटुंबीयांनी राजकीय कटाचा आरोप केला. त्यानुसार राजकीय, सामाजिक आणि इतर सर्व बाजूंनी तपास सुरू असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.

Scroll to Top