शेलार येथे आयोजित ‘सेवा संकल्प’ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील यशस्वी कारकीर्दीस 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने तसेच “सेवा परमो धर्मः” या उदात्त भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा, सुविधा व कल्याणकारी योजनांचा लाभसुलभव पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यासाठी राज्य शासनामार्फत दि. 17 सप्टेंबर 2026 ते दि.17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत “सेवा संकल्प अभियान” संपूर्ण राज्यभरात अत्यंत उत्साहात राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून, दि. 01 ऑक्टोबर 2026 रोजी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप तसेच तहसिलदार अभिजीत खोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी व तहसिलदार कार्यालय, भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ शेलार अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, शेलार येथील सभागृहात मंडळस्तरीय विशेष ‘सेवा संकल्प’ शिबिराचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या शिबिरास महसूल नायब तहसिलदार आदेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य दीपक जनार्दन भोईर, विलास गोविंद रापटे, सामाजिक कार्यकर्ते भरत नामदेव भोईर आणि ग्रामपंचायत सदस्य दशरथ बाळू भोईर आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. तसेच शेलारचे मंडळ अधिकारी धनंजय आर. वतारी, सहाय्यक मंडळ अधिकारी किरण केदार, महसूल सहाय्यक आनंद तिवाड, ग्राम महसूल अधिकारी रुपेश कारभारी, शारदा घोलप, दीप्ती जाधव, महसूल सेवक, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भिवंडी येथील कर्मचारी, ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी आणि संबंधित विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत प्रभावी समन्वय साधत नागरिकांच्या अडचणी थेट समजून घेतल्या. या शिबिरादरम्यान महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाशी संबंधित विविध सेवा, दाखले आणि शासकीय कागदपत्रांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले.



