ज्येष्ठ नागरिक म्हणजे शहराचा अनुभव समृध्द ठेवा असून ज्येष्ठांच्या आनंदासाठी नवी मुंबई महानगरपालिका अतिशय चांगले काम करीत आहे, यापुढील काळात ज्येष्ठांना अपेक्षित असे अधिक उत्तम काम होईल अशा विश्वास महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मोरे, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, पाणीपुरवठा समिती सभापती रविकांत पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार, नगरसेविका अॅड. भारती पाटील, समाजविकास विभागाचे उपआयुक्त प्रकाश कांबळे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष तथा नमुंमपा ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र कक्षाचे सदस्य अण्णासाहेब टेकाळे व मुंबई-नवी मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे, नमुंमपा ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र कक्षाच्या सदस्य डॉ. शालिनी इंगळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठांना योग्य तो सन्मान मिळायला हवा तसेच आरोग्य विषयक सुविधांची व्याप्ती वाढायला हवी असे सांगत गणेश नाईक यांनी महानगरपालिका व पोलीस यांच्या सहयोगाने ज्येष्ठांसाठीचा स्वतंत्र कक्ष निर्माण करून त्याठिकाणच्या युनिक नंबरवर ज्येष्ठांनी मदतीसाठी संपर्क साधल्यास त्वरित आवश्यक कार्यवाही करण्याची यंत्रणा निर्माण करावी असे सूचित केले.
याप्रसंगी बोलताना उपमहापौर दशरथ भगत यांनी ज्येष्ठ नागरिक ही पॉवर बँक असल्याचे सांगत ज्येष्ठांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका तत्पर असल्याचे सांगितले. नाईकसाहेबांच्या संकल्पनेतून साकारलेली सुगंधी शहर योजना नवी मुंबईच्या शाश्वत स्वच्छता आणि सुंदरतेसाठी लाभदायक असल्याचे मत व्यक्त करीत ज्येष्ठांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या अनुभवाचा उपयोग नवी मुंबईचे मानांकन उंचावण्यासाठी करावा असे आवाहन उपमहापौर महोदयांनी केले.
ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करणारी तसेच 35 विरंगुळा केंद्रे, एनएमएमटी बसने मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र अशा विविध सुविधा इतक्या मोठ्या प्रमाणात पुरविणारी नवी मुंबई ही देशातील एक नंबरची महापालिका असल्याचे मत व्यक्त करीत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब टेकाळे यांनी महाराष्ट्रातील इतर शहरांपेक्षा नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिक जास्त सुखी आणि समाधानी असल्याचे मत व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा



