वनविभाग ठाणे, वनपरिक्षेत्र कार्यालय कल्याण आणि जीवनदीप महाविद्यालय, गोवेली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून वन्यजीव सप्ताह (२ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर) चा शुभारंभ शुक्रवारी जीवनदीप महाविद्यालय, गोवेली येथे करण्यात आला.
यावेळी “रन फॉर वाईल्ड लाईफ – एक धाव वन्यजीवांसाठी” या संकल्पनेवर आधारित दौड आयोजित करण्यात आली होती. या दौडमध्ये महाविद्यालयाचे एन.सी.सी. कॅडेट्स, वॉर फाऊंडेशनचे सदस्य, वाईल्ड लाईफ इंडिया ०५ चे स्वयंसेवक, वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी, कल्याण निलेश आखाडे, भाजपाचे तालुका अध्यक्ष शेखर लोणे, मानद वन्यजीव रक्षक प्रेम आहेर, गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने टिटवाळा येथील प्रसिद्ध गणेश मंदिर परिसरात स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले. यावेळी बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे यांनी सांगितले की, “या संपूर्ण सप्ताहात कल्याण वनपरिक्षेत्राअंतर्गत विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये वन्यजीव संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम, व्याख्याने व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.” वन्यजीवांविषयी प्रेम आणि सहअस्तित्वाचा संदेश या दौडमधून देण्यात आला.
वन्यजीव सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ’रन फॉर वाईल्ड लाईफ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद



