मुलांना ‘गुड फ्रेंड’ आणि ‘बॅड फ्रेंड’मधील फरक समजावून देणे गरजेचे-मंत्री मंगलप्रभात लोढा

'गुड फ्रेंड' आणि 'बॅड फ्रेंड'मधील फरक समजावून देणे गरजेचे

सेवा संकल्प अभियानातंर्गत ‘ड्रग्स फ्री मुंबई – विद्यार्थी समुपदेशन सत्र व शिक्षण प्रशिक्षण’ कार्यक्रम संपन्न

ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाची सुरुवात ३० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. हे अभियान वर्षभर सुरू राहणार आहे. आतापर्यंत आपण ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ याबाबत मुलांना जागरूक केले आहे. आता ‘गुड फ्रेंड’ आणि ‘बॅड फ्रेंड’ यातील फरक समजून घेण्याची आणि मुलांना त्याबाबत जागरूक करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. सांताक्रुझ पूर्वेकडील कलिना कॅम्पस् येथील मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे ‘सेवा संकल्प अभियानातंर्गत ड्रग्स फ्री मुंबई -विद्यार्थी समुपदेशन सत्र व शिक्षण प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री लोढा बोलत होते. ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानामध्ये शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आणि पोलीस प्रशासन इत्यादींनी उत्तम कामगिरी केली, अशा २१ जणांचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली. मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, नशा हा शरीर आणि समाजाला पोखरणारा कॅन्सर आहे. एकदा नशेचे व्यसन शरीरात आणि मनात शिरले, तर त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. कितीही उपचार केले तरी त्याचे परिणाम अनेकदा आयुष्यभर वेदना देऊन जातात. त्यामुळे नशेपासून स्वतःला आणि आपल्या पुढील पिढीला दूर ठेवण्यासाठी आजपासूनच सजग राहणे, योग्य मित्रांची निवड करणे आणि नशेविरोधात एकत्रितपणे लढणे ही काळाची गरज आहे.

Scroll to Top