गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या करचोंडे गावाच्या स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांतून आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे स्मशानभूमीच्या कामाचा अखेर शुभारंभ झाला आहे. अनेक वर्षांपासून जागेअभावी रखडलेल्या या प्रश्नावर तोडगा निघाल्याने करचोंडे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
करचोंडे गावासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. जागा उपलब्ध होत नसल्याने तसेच विविध वादविवादांमुळे स्मशानभूमीचा प्रश्न सुटू शकला नव्हता. मात्र, हेदवली येथील ग्रामस्थ शरद बाळशा देसले यांनी स्मशानभूमीसाठी जागा दान केल्यामुळे अखेर या प्रश्नावर मार्ग निघाला आहे. कणकवीरा नदीकाठी स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात झाली असून, ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे.
या स्मशानभूमीसाठी माजी उपसरपंच जयवंत नाना खंडागळे यांनी सलग पाच वर्षे शासकीय स्तरावर विशेष प्रयत्न करून पाठपुरावा केला. स्थानिक आमदार किसन कथोरे तसेच माजी पंचायत समिती सदस्य अनिल मेघराज घरत यांच्याकडे त्यांनी सातत्याने हा प्रश्न मांडला. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध व्हावी आणि काम मार्गी लागावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
त्याचबरोबर विद्यमान सरपंच शोभा विनायक निरगुडा यांनीही स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. उपसरपंच गुरुनाथ देसले, सदस्य मनीषा जयवंत खंडागळे आणि आरती दीपक पवार यांनीही यासाठी पाठपुरावा केला.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न जागादानामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मार्गी लागल्याने करचोंडे परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गावाच्या मूलभूत सुविधांशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण दूर होणार आहे.
२५ वर्षांहून अधिक काळ रखडलेला प्रश्न मार्गी लागण्यासाठी जागा दान करणारे शरद बाळशा देसले यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले असून, त्यांच्या सामाजिक दातृत्वाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
२५ वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या करचोंडेच्या स्मशानभूमीच्या कामाचा अखेर शुभारंभ



