कृष्णा राम याला जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक १६, बेलवली येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. मुलींच्या कबड्डी संघाच्या यशानंतर आता कुस्तीमध्येही शाळेच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कृष्णा राम याने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचे अजिंक्यपद पटकावत शाळेसह बदलापूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
ठाणे येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कृष्णाने १९ वर्षांखालील वयोगटातील ६० किलो वजनी गटाच्या ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रतिस्पर्धी कुस्तीपटूंवर मात करत त्याने प्रथम क्रमांक मिळवला आणि ठाणे जिल्हा अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची मुंबई विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाळेला स्वतःचे क्रीडांगण उपलब्ध नसतानाही विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कृष्णाने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे. क्रीडा शिक्षक किशोर गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रशासनाकडून विविध स्तरांवर सहकार्य केले जात आहे. नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंकाताई दामले, मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि शिक्षण विभागप्रमुख महेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, क्रीडा साहित्य तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक सहकार्य मिळत असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. कृष्णा राम याने मिळवलेल्या या यशाबद्दल नगर परिषदेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी, शिक्षण विभाग, शाळेच्या मुख्याध्यापिका खाचणे मॅडम, सर्व शिक्षकवृंद, क्रीडा मार्गदर्शक योगेश गायकर सर आणि बेलवली ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
कृष्णाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना त्याने यापुढेही असेच यश संपादन करून बदलापूर शहराचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हास्तरावर मिळवलेल्या या यशानंतर आता कृष्णाची मुंबई विभागीय स्पर्धेतील कामगिरी कशी राहते, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. कृष्णाच्या या यशामुळे कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.



