गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देताना शैक्षणिक सुविधांच्या पूर्ततेकडेही विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील स्थिती जाणून घेण्यासाठी नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरूवात केली असून त्यांनी घणसोली, कोपरखैरणे, वाशी विभागातील काही शाळांना भेट दिली आणि मौलिक सूचना केल्या. या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासमवेत शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस उपस्थित होते. शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनीही या शाळा पाहणी दौऱ्यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये महापौरांनी शाळांच्या इमारतींची पाहणी करून शाळांमधील पायाभूत सुविधा, आवश्यक सोयीसुविधा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती जाणून घेतली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, नमुंमपा शाळा क्र. ५५, कातकरीपाडा, रबाळे येथील शाळा इमारतीच्या पाहणीने दौऱ्यास सुरूवात झाली. यावेळी माजी महापौर व विद्यमान नगरसेवक सुधाकर सोनवणे यांच्यासमवेत महापौरांनी इमारतीची पाहणी केली आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शाळेतील विविध समस्या व आवश्यक सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेतली.
महापौर सुजाता पाटील यांनी केली नवी मुंबई महापालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणी



