कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत १०७ किलो `गांजा’ जप्त

कल्याण – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याणच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ३ आरोपींकडून एकुण १०७ किलो गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण २१ लाख ९१ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकातील सपोनि अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस उप निरीक्षक जितेंद्र ठोके, पो. हवा. देवरे, पो.शि राहुल शिंदे, अमित शिंदे, बिरपन, खांडेकर व खरसाण असे खडकपाडा पोलीस ठाणे ह‌द्दीत बेकायदेशीर अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे, डिलर व अभिलेखावरील पाहिजे, फरारी आरोपींचा शोध घेवुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्ती करीता रवाना झाले होते. गस्ती दरम्यान पोलीस पथक सोमवारी दुपारी २ च्या सुमारास वाडेघर, डम्पिंग ग्राउंडजवळ आले असता पथकास तीन इसम हातवारे करून आपसात चर्चा करत संशयितरित्या आढळुन आले.

त्यांचेकडे हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या गोण्या आढळून आल्याने पथकाचा त्यांच्यावर संशय बळावला. म्हणून या तिन्ही इसमांकडे विचारपुस करण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ जात असताना ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले म्हणुन त्यांना पळून जाण्यास वाव न देता त्यांना जागीच ताब्यात घेतले. यामध्ये वसिम नुरूजमा खान उर्फ पिला वय ३६ वर्षे रा. बिलालनगर, शांतीनगर भिंवडी, दिनेशकुमार सजीवर सरोज, वय. ३० वर्षे रा. रूम नं.२ मार्कर्ड यादर चाळ, लुईसवाडी, वागळे इस्टेट ठाणे पश्चिम आणि मोहित मेवालाल वर्मा, वय. २७ वर्षे रा. शिवशक्ती बिल्डींग, एलव्हीएस रोड, मुंलूंड पश्चिम यांचा समावेश आहे.

या इसमांकडे २१ लाख ४० हजार किंमतीचा १०७ किलो ५० ग्रॅम वजनाचा ‘गांजा’ हा अंमली पदार्थ, १० हजार ५०० रुपये रोख रक्कम आणि  ४१ हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल फोन असा एकूण २१ लाख ९१ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिघांविरूध्द खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हि कामगिरी परिमंडळ ३ कल्याण विशेष कारवाई पथक व खडकपाडा पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली आहे. अशा प्रकारे परिमंडळ ३ कल्याण मध्ये अंमली पदार्थ विरुध्द कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top