कल्याण – श्रीराम मंदिराच्या आंदोलनानंतर देशातील सर्व हिंदू समाज एकवटायला सुरुवात झाली असून आज केवळ धार्मिक आणि वैचारिकरित्या नव्हे तर राजकीयदृष्ट्याही एकवटला असल्याचे प्रतिपादन शिवशंभो मंचाचे प्रांत संयोजक अभयराजे जगताप यांनी कल्याणात केले. सकल हिंदू समाजातर्फे कल्याण पश्चिमेतील स्वानंद नगर मैदानात झालेल्या सकल हिंदू समाज संमेलनात ते बोलत होते.
पूर्वी देशाच्या इतर राज्यांमध्ये काय सुरू आहे, काश्मीरमध्ये काय होतंय, दक्षिणेत काय होतंय, बंगालमध्ये काय होतंय या वैचारिकतेमध्ये अडकून पडला होता. मात्र जसे श्रीराम मंदिराचे आंदोलन सुरू झाले आणि हळूहळू देशातील सर्व हिंदू एकत्र यायला सुरुवात झाली. आपल्या हिंदू संस्कृतीचा पराक्रमी इतिहास आपण जाणून घेतला तर आपल्याला असे जाणवेल की एकीकडे अफगाणिस्तानमधील कंदहार (महाभारतातील गंधार) पासून ते शेजारील आताचा म्यानमार आणि प्राचीन काळातील ब्रह्मदेश हेदेखील आपल्या अखंड हिंदुस्थानचा भाग होता. मात्र जिथे जिथे हिंदू लोकसंख्य कमी झाली तो तो प्रदेश आपल्या देशापासून तुटत गेल्याचे सांगत आज ‘जिहाद’ हा केवळ आपल्या देशासमोरील नव्हे तर संपूर्ण जगासमोरील मोठी समस्या निर्माण झाल्याचे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.
या सकल हिंदू समाज संमेलनाला स्थानिक भाजप नगरसेविका हेमलता पवार, नगरसेवक शामल गायकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विवेकानंद शाखेचे प्रमुख ऋषिकेश केळकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीची उपस्थिताना ओळख दिली.


