उष्याचा पारा ४१.१ अंशांवर; विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी
एकेकाळी तलावांचे, हिरवाईचे आणि आल्हाददायक वातावरणाचे शहर म्हणून ओळख असलेले ठाणे आता अक्षरशः काँक्रिटच्या भट्टीत रूपांतरित होत चालले आहे. सोमवारी ठाणे शहराचे कमाल तापमान तब्बल ४१.१ तर किमान २९.७अंश सेल्सियसवर पोहोचले आणि एप्रिलच्या सुरुवातीलाच ठाणेकरांना मे महिन्याच्या झळा सहन कराव्या लागल्या.
ही केवळ नैसर्गिक उष्णतेची लाट नाही, तर शहराने स्वतःच स्वतःसाठी तयार केलेले “हीट आयलंड” संकट आहे. ठिकठिकाणी उभ्या राहणाऱ्या काचेच्या उंच इमारती, सिमेंट-काँक्रिटचे वाढते जाळे, डांबरी रस्त्यांचे विस्तारणारे साम्राज्य आणि विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड यामुळे शहराचा नैसर्गिक श्वास गुदमरू लागला आहे.
पूर्वी झाडांच्या सावलीत थंडावा अनुभवणारे रस्ते आता तापलेल्या डांबरातून उष्णतेचे लोट फेकताना दिसत आहेत. काचेच्या इमारतींवर पडणारे सूर्यकिरण परावर्तित होऊन उष्णतेची तीव्रता अधिक वाढवत आहेत. शहरातील मोकळी जमीन, ओलसर जागा, छोटे जलस्रोत आणि हिरवे पट्टे झपाट्याने नाहीसे होत असल्याने उष्णता शोषून घेणारी नैसर्गिक व्यवस्था कोलमडत चालली आहे.
विकास आवश्यक आहेच; मात्र निसर्गाचा गळा घोटून होणारा विकास शेवटी मानवी अस्तित्वालाच आव्हान देणारा ठरत आहे. १०० वर्षे जुनी झाडे तोडून त्यांच्या बदल्यात काही छोट्या रोपांची लागवड केली जाते; पण त्या रोपांना त्या विशाल वृक्षांच्या सावलीची, प्राणवायूची आणि पर्यावरणीय संतुलनाची सर कधीच – येऊ शकत नसल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी सांगितले.


