नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8291920504 या क्रमांकावरील व्हॉट्स अॅप चॅटबॉट सेवेचा लाभ महानगरपालिकेशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत असून अल्पावधीतच ही अत्याधुनिक डिजीटल सेवा नागरिकांच्या पसंतीस पडत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेशी संबधित कामांसाठी कोणत्याही महापालिका कार्यालयात प्रत्यक्ष जावे न लागता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे भर दिला जात आहे. या अनुषंगाने शासनाने अधिसूचित केलेल्या ६८ लोकसेवांसह आणखी ४५ सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जन्म-मृत्यू प्रमाणपत्रापासून बांधकाम परवानगी प्रमाणपत्र अशा विविध ११३ सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत.
यामधील एक महत्वाची सुविधा म्हणजे व्हॉट्स ॲप चॅटबॉट असून आजच्या डिजीटल युगात नागरिकांशी जोडणारे हे एक अत्यंत प्रभावी व स्वयंचलित माध्यम आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने व्हॉट्स ॲप चॅटबॉटव्दारे विविध सेवा एकात्मिक स्वरुपात उपलब्ध करुन दिल्या आहेत.
यामध्ये, मालमत्ता कर देयके ऑनलाईन उपलब्ध करुन देणे व देयक रक्कम भरणा करणे, पाणीपट्टी देयके ऑनलाईन उपलब्ध करुन देणे व देयक रक्कम भरणा करणे, समाज विकास विभागाच्या ५० हून अधिक लोककल्याणकारी योजनांकरिता एआय सहाय्यक म्हणून सेवा देणे, सर्व लोकसेवांचे अर्ज व्हॉट्स ॲपवर उपलब्ध करुन देणे, मराठीसह इंग्रजी भाषेचा पर्याय असणे अशा विविध सुविधांचा समावेश आहे.
व्हॉट्स ॲप चॅटबॉटव्दारे ३ लाखाहून अधिक नागरिकांना मालमत्ता कर भरल्याची सूचना त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर देण्यात आलेली आहे.
अभय योजनेचे संदेशही १ लाखाहून अधिक मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना पाठविण्यात आलेले आहेत.
१ लाखाहून अधिक नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्यासाठी आवाहन करणारे संदेश देण्यात आलेले आहेत.
सद्यस्थितीत १ लाखाहून अधिक नागरिकांना जनगणना 2027 मध्ये सहभागी होण्यासाठी संदेश पाठविण्यात आलेले आहेत.
मार्च 2026 मध्ये व्हॉट्स ॲपव्दारे पाठविलेल्या संदेशानुसार साधारणत: 10 कोटी रक्कम जमा झालेली आहे. विशेष म्हणजे यासाठी आलेला संदेश प्रसारण खर्च केवळ रु. 60 हजार इतकाच आहे.
7 ते 8 हजार वापरकर्त्यांनी व्हॉट्स पेमेंट लिंकव्दारे देयक रक्कम भरणा केलेली आहे.
या व्यतिरिक्त 1 लाखाहून अधिक नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यास मदत मिळविण्यासाठी व्हॉट्स ॲपचा सक्रिय वापर केलेला आहे.
8291920504 या क्रमांकावरील व्हॉट्स ॲप चॅटबॉट ही ऑनलाईन सेवा 24X7 उपलब्ध असल्याने नागरिक कार्यालयीन वेळेच्या नंतर त्यांच्या सोयीने अगदी रात्रीही व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही याचा वापर करु शकतात. या सुविधेव्दारे महानगरपालिकेशी संबंधित माहिती, सेवा, देयके याबाबत तात्काळ प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांकडून व्हॉट्स ॲप चॅटबॉट सेवेचा वापर सातत्याने वाढतांना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे ही सुविधा वापरण्यास सोपी असल्याने व मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध असल्याने नागरिकांना सहज संवाद साधणे सोयीचे होते.
त्यामुळेच सुशिक्षितांचे शहर अशी ओळख असणा-या नवी मुंबईकर नागरिकांकडून श्रम, मूल्य व वेळेची बचत करणा-या, अत्यंत कार्यक्षम व तत्पर अशा 8291920504 क्रमांकावरील व्हॉट्स ॲप चॅटबॉट सेवेचा जास्तीत जास्त परिणामकारक वापर होतांना दिसत आहे.


