मिलिंद जाधव
भिवंडी – भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळील बोरीवली गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेली नवीन पाणीपुरवठा योजना अखेर प्रत्यक्षात मार्गी लागली असून सध्या पाईपलाईन टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या योजनेला सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गती मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बोरीवली गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, सन २००१ मध्ये उभारण्यात आलेली जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत होती. गावातील ८ ते ९ हजार नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे ९ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेत नवीन उंच पाण्याची टाकी, फिल्टर प्लांट तसेच विस्तृत पाईपलाईन टाकण्याचा समावेश करण्यात आला आहे.मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे ही योजना गेली तीन ते चार वर्षे रखडून पडली होती. परिणामी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. जियाद सोहराब गुजर यांनी विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभाग, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी समन्वय साधत त्यांनी योजनेचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून योजना आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात पोहोचली आहे.
सध्या पाच्छापूर येथील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीपासून बोरीवली गावापर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. सरपंच तथा प्रशासक अन्वर अब्दुल पिंजारी आणि ग्रामपंचायत अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असून ग्रामस्थांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर बोरीवली गावातील नागरिकांना नियमित, स्वच्छ आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याने अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, योजनेचे उर्वरित काम वेळेत पूर्ण होण्यासाठी शासनाने उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.या कामासाठी माजी पंचायत समिती सदस्य मुशीर नाचण, अकबर अब्दुल्ला खोत, दिलीप दिवे, मुसद्दीक मुल्ला, साद कासकर, अली हरे, मसिह नाचण, कैस बर्डी, मुजीब कासकर तसेच बोरीवली ग्रामपंचायत कमिटीने विशेष सहकार्य केले आहे.


