दिवा- शीळ मुख्य रस्ता अंधारात; पथदिव्यांच्या अभावामुळे नागरिक संतप्त

दिवा –  दिवा- शीळ मुख्य रस्त्यावर अद्यापही पुरेशा प्रमाणात पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारमय होत असल्याने वाहनचालक, पादचारी, महिला तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात तसेच अनुचित घटनांचा धोका वाढत असतानाही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवा- शीळ हा अत्यंत वर्दळीचा चार ते साडे चार किलोमीटरचा हा मुख्य मार्ग असून दररोज हजारो नागरिक या रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्यावर पुरेशा पथदिव्यांची सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. खर्डी – फडकेपाडा अशा अनेक ठिकाणी संपूर्ण अंधार असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे या समस्येबाबत नागरिकांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी व मागण्या केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासना विरोधात संताप वाढत आहे.

यासंदर्भात नागरिकांनी पालिका प्रशासनाला खडेबोल सुनावत तात्काळ पथदिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. “नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top