काँग्रेस पक्षाच्या संघटन विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत मुरबाडचे युवा नेते चेतनसिंह पवार यांची ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींच्या मान्यतेनंतर झालेल्या या नियुक्तीमुळे ठाणे ग्रामीण काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
चेतनसिंह पवार हे गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाशी निष्ठेने जोडलेले असून त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार युवक, आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी विविध आंदोलन, बैठका, जनसंपर्क मोहिमा आणि सामाजिक उपक्रम राबवत तळागाळातील कार्यकर्त्यांशी जवळीक निर्माण केली आहे. मुरबाड तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ग्रामीण भागातील अनेक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी सातत्याने निभावली. त्यामुळेच पक्षाने युवा नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे जिल्हा ग्रामीण काँग्रेसची धुरा सोपवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँग्रेसची संघटना अधिक सक्षम करणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकट करणे हे मोठे आव्हान आता पवार यांच्यासमोर असणार आहे. विशेषतः शेतकरी, आदिवासी आणि युवकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करत पक्षाला नवसंजीवनी देण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
नियुक्तीनंतर चेतनसिंह पवार यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानत, काँग्रेसची विचारधारा, संविधानिक मूल्ये आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.


