काल्हेर ते ताडाळी पाईप लाईन रस्त्याचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन
भिवंडीतील काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन खासदार सुरेश म्हात्रे यांच्या शुभहस्ते रविवारी पार पडले. या रस्त्यामुळे अंजुर फाटा काल्हेर ते ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
अंजुर फाटा काल्हेर ते ठाणे मार्गावर गोडाऊन व अरुंद रस्त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीत नागरिकांना दोन ते अडीच तास अडकून रहावे लागत होते. यासाठी काल्हेर ते ताडाळी हा पर्यायी रस्ता भिवंडीकरांसाठी महत्वाचा होता. मात्र मागील पंचवीस वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास करतांना वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
या रस्त्याचे काँक्रेटीकरण लवकरात लवकर करावे अशी मागणी खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मागील अनेक वर्षांपासून राज्य शासन, बृहमुंबई महापालिका व एमएमआरडीए प्रशासनाकडे लावून धरली होती. या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्या नंतर माजी खासदार व तत्कालीन केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला होता. मात्र रस्त्याच्या Bike निधीसाठी खासदार सुरेश म्हात्रे यांनी पाठपुरावा केला असल्याने खा. सुरेश म्हात्रे यांनी पाटील यांनी उदघाटन केल्याच्या दुसऱ्याच दिवशी या रस्त्यावर गोमुत्र शिंपडून या रस्त्याचे दुसऱ्यांदा उद्घाटन केले होते. रविवारी या रस्त्याचे उद्घाटन खा. म्हात्रे यांनी करत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
आपण अनेक वर्ष पाठपुरावा केला होता. माजी केंद्रीय मंत्र्यांनी केवळ श्रेय घेण्याचे काम केले होते त्यामुळे दुसऱ्याच दिवशी आम्ही गोमूत्र शिंपडून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला होता. त्यावेळी माजी मंत्र्यांनी आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नव्हती कारण या रस्त्याच्या कामाच्या पाठ पुराव्या बाबत त्यांच्याकडे उत्तरेच नव्हती आता हा रस्ता बनला असून या रस्त्यामुळे भिवंडीकरांची वाहतूक कोंडीतून निश्चितच सुटका होणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.
या रस्त्यासाठी आपण स्वतः बृहन्मुंबई महापालिका, एमएमआरडीए अधिकारी व तत्कालीन मंत्र्यांची भेट घेऊन या रस्त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या रस्त्यांमुळे मागील पंचवीस वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा कार्यकर्ते सुमित म्हात्रे यांनी दिली आहे.


