एमआरआय, कॅथलॅब, डायलिसिस सेंटर, पशुवैद्यकिय रुग्णालय व इतर आरोग्य सुविधांचे नवी मुंबईत लोकार्पण

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा गुणवत्तापूर्ण करण्यावर भर दिला जात असून लोकार्पण व शुभारंभ होणाऱ्या वैद्यकिय सेवा नागरिकांसाठी अतिशय महत्वाच्या असल्याचे सांगत  महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी या सेवा नवी मुंबईतील नागरिकांना प्राधान्याने उपलब्ध करुन दिल्या जाव्यात असे सूचित केले. आरोग्य सेवा बळकटीकरणांतर्गत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व कामांचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते वाशी सार्वजनिक रुग्णालयात संपन्न झाला त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करीत होते.

यावेळी  नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे, उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक तसेच आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ व उपसभापती गणेश सकपाळ, ब प्रभाग समिती सभापती रुपाली भगत, क प्रभाग समिती शैला पाटील, ड प्रभाग समिती सभापती प्रकाश मोरे, ई प्रभाग समिती सभापती चंद्रभागा मोरे, फ प्रभाग समिती सभापती ललिता मढवी, महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार, पाणी पुरवठा सभापती रविकांत पाटील, क्रीडा समिती सभापती गिरीश म्हात्रे, माजी महापौर तथा नगरसेवक जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, अंजनी भोईर त्याचप्रमाणे शहर अभियंता शिरीष आरदवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. माधवी इंगळे आणि इतर नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            याप्रसंगी सार्वजनिक रूग्णालय, सेक्टर १०, वाशी येथे –एम.आर.आय. सेंटर लोकार्पण, मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग (सी.एस.एस.डी.) कार्यान्वित करणे, रूग्णालय बेड्स उपलब्धता डॅशबोर्ड कार्यान्वित करणे, वाशी आणि ऐरोली येथे ह्रदयविकार उपचार केंद्र (कॅथलॅब) कामाचा शुभारंभ, मिल्क बँक सुविधा लोकार्पण, मॉड्युलर मॉर्च्युरी (शवागृह) कार्यान्वित करणे आदी सुविधांचे लोकर्पण व शुभारंभ प्रत्यक्ष स्वरुपात त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, से.8, सीबीडी बेलापूर येथील डायलिसीस सेंटर लोकार्पण आणि सेक्टर 24, जुईनगर येथील पशुवैद्यकीय रूग्णालय लोकार्पण ऑनलाईन संपन्न झाले.

या सोबतच नमुंमपा आणि गणेश नाईक यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून उभारण्यात आलेले स्वामी विवेकानंद भवन, से.१४, वाशी येथील डायलिसीस सेंटरचे लोकार्पण आणि महापे येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण प्रत्यक्ष स्थळी जाऊन मंत्री महोदयांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यामधील मिल्क बँक सुरु करण्याबाबतची मागणी व पाठपुरावा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आला आहे.

Scroll to Top