अंबरनाथ पश्चिमेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वह्या वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना नवी दिशा मिळावी, त्यांच्या यशाच्या प्रवासात समाजाचाही सहभाग असावा आणि शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री कोणत्याही विद्यार्थ्याला कमी पडू नये, या उद्देशाने हा उपक्रमआयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन अंबरनाथ पश्चिमेतील विविध शाळांमध्ये तब्बल १० हजार वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत रोसरी शाळा, टी.व्ही.एम. शाळा, आदर्श बाळ विद्यामंदिर, भोस्बाई प्राथमिक विद्यालय, तात्यांची शाळा, महंत कमलदास बाबा हिंदी प्राथमिक विद्यालय तसेच परिसरातील इतर अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. वाढत्या शैक्षणिक खर्चाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमामुळे अनेक पालकांना आर्थिक दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांनाही नव्या जोमाने शिक्षणाची सुरुवात करता आली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, आरोग्यविषयक, सामाजिक आणि जनकल्याणकारी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याच्या ध्येयातून आणि विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सक्षम करण्याच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमादरम्यान चेहऱ्यावरील आनंद, पालकांच्या मनातील समाधान आणि शिक्षकांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भावना यामुळे या उपक्रमाचे खरे महत्त्व अधोरेखित झाले. शिक्षण हेच उच्चल भविष्याचे प्रभावी साधन असून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.


