महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 2050 मि.मी. व्यासाच्या मुख्य भूमिगत जलवाहिनीवर पनवेल तालुक्यातील देवद व विचुंबे ग्रामपंचायत हद्दीत काही व्यक्तींमार्फत अनधिकृत नळजोडणी करून पाण्याचा वापर होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी केली असता मुख्य जलवाहिनीवर सुमारे 100 मि.मी. व्यासाची अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी एप्रिल 2025 मध्ये सदर अनधिकृत नळजोडणी महानगरपालिकेमार्फत त्वरित खंडित करण्यात आली होती. तसेच विचुंबे व देवद ग्रामपंचायतींना अनधिकृत नळजोडणीद्वारे वापरलेल्या पाण्यापोटी दंडात्मक स्वरूपाची रु. 80,92,560/-इतकी रक्कम भरण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती.
त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये मुख्य जलवाहिनीवरील ब्रेकडाऊन दुरुस्तीच्या वेळी त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे आढळून आले. सदर जोडणी खंडित करण्यासाठी महानगरपालिकेने कारवाई हाती घेतली असता काही स्थानिकांकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे त्या वेळी सदर जोडणी खंडित करणे शक्य झाले नाही. तसेच देवद व विचुंबे ग्रामपंचायतींना सदर अनधिकृत जोडणी त्वरित काढून टाकण्याबाबत व दंडात्मक रक्कम भरण्याबाबत नोटीस देण्यात आली होती.
तथापि, त्यांच्याकडून कार्यवाही करण्यात आली नाही.
त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दिनांक 28 मार्च 2026 रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत खांदेश्वर पोलीस स्टेशन यांचेकडील पोलीस बंदोबस्तात संबंधित अनधिकृत नळजोडणी खंडित करण्यात आली. यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने केलेल्या पुढील तपासणीत याच ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर पुन्हा छेडछाड करून पाण्याचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळून आले. अनधिकृतरित्या वापरलेल्या पाण्याबाबत दंडात्मक स्वरूपाची रु. 1,17,61,239/- इतकी रक्कम भरणा करण्याबाबत जिल्हा परिषद, रायगड यांना कळविण्यात आले व सदर अनधिकृत जोडणी त्वरित खंडीत करण्यासाठी कळविण्यात आले.


