अमेरिका इराण युद्धानंतर सर्व जगाला गॅस पुरवठ्याच्या झळा बसल्यानंतर भारतात गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम दिसून आला. त्यानंतर गॅस सिलेंड साठा करणाऱ्यांवर कारवाई सुरू झाल्या. या कारवाया थंडावल्या असतानाच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या दक्षता पथकाने भिवंडी शहर शिधावाटप अधिकारी व तालुका पुरवठा निरीक्षक यांच्या संयुक्त कारवाई मध्ये शहरालगतच्या खोणी गावच्या हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये एच पी, भारत गॅस, इंडन या गॅस कंपनीचे ५ किलो वजनाचे घरगुती वापराचे ६९२ भरलेले ८० रिकामे असे ७७२ गॅस सिलेंडर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खोणी ग्रामपंचायत हद्दीत मिठपाडा येथील श्री राम ट्रेडर्स या अन्नधान्य विक्रीच्या घाऊक गोदामात मोठ्याप्रमाणावर अवैध्य गॅस सिलेंडर साठा ठेवल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाचे राज्य दक्षतपथक कारवाई नियंत्रक चंद्रकांत डांगे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनियंत्रक गणेश बेल्लाळे व पथकातील निरीक्षक राजीव भेले, रवींद्र राठोड, अरुण काते, देवानंद थोरवे, राजेश सोरटे, राहुल इंगळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी तालुका गौतम राऊत, शहर शिधावाटप अधिकारी रत्नदीप सावंत, सहाय्यक शिधावाटप अधिकारी अमोल गरकर, निरीक्षक चेतन राजगडकर यांनी बुधवारी दुपारी या गोदामावर छापा टाकला असता तेथे अवैध पणे एच पी, भारत गॅस, इंडन या गॅस कंपनीचे ५ किलो वजनाचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर आढळून आले. किराणा दुकानात ५ किलो वजनाचे २० गॅस सिलेंडर ठेवण्याचा परवाना असताना त्याने अवैध पणे मोठ्या प्रमाणावर गॅस साठा मानवी वस्तीत जीविताला धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवला जात आहे.


