साठेपाडा येथे ‘साथ’ व ‘कोवळी भाजी’ सण साजरा
अबिटघर ग्रामपंचायत हद्दीतील साठेपाडा येथे आदिवासी समाजाची असलेली गावाची ‘साथ’ आणि ‘कोवळी भाजी सण’ मोठ्या श्रद्धा, उत्साह व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आले.
यावेळी निसर्गाची विधिवत पूजा करून जंगल, जल, जमीन आणि पर्यावरणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आदिवासी संस्कृतीत निसर्गाला देवतुल्य मानले जाते. त्याच भावनेतून नव्याने उगवलेल्या कोवळ्या भाज्या प्रथम निसर्गाला अर्पण करून त्यानंतर सामूहिकरीत्या त्यांचा आस्वाद घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही जपली
जात आहे. ‘साथ’ हा केवळ सण नसून समाजातील एकी, बंधुभाव, पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचे प्रतीक आहे. यामध्ये ग्रामस्थ, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचा निर्धार व्यक्त केला. निसर्गाविषयी आदर, सामूहिक जीवनपद्धती आणि परंपरांचे जतन हीच आदिवासी संस्कृतीची खरी ओळख असल्याचे सरपंच साक्षी संतोष साठे यांनी म्हटले.


