भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय आघाडी, कल्याण जिल्ह्याची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत संघटन विस्तार, आगामी जिल्हा कार्यकारिणी व विविध समित्यांची स्थापना, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या तसेच उत्तर भारतीय समाजाला अधिक संघटित व सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हा संघटन महामंत्री रवि सिंह ठाकूर, जिल्हा कोषाध्यक्ष दिनेश दुबे, जिल्हा सचिव शशिधर शुक्ला, मंडळ अध्यक्ष दीपक त्रिपाठी, सौरभ तिवारी, किशोर यादव, स्वाती सिंह, प्रीती तिवारी, संदीप शर्मा, वासू उपाध्याय यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत उत्तर भारतीय आघाडीचे कल्याण जिल्हाध्यक्ष नागेंद्र शर्मा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना संघटनेतील एकजूट आणि शिस्तीवर भर दिला. उत्तर भारतीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक असून वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा संघटना सर्वोच्च मानून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मतभेद चालतील, मनभेदही चालतील, सूचना स्वीकारल्या जातील, मात्र व्यक्तिवाद आणि गटबाजी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. भारतीय जनता पक्ष हा कोणत्याही एका व्यक्तीभोवती फिरणारा पक्ष नसून विचारधारा, शिस्त आणि राष्ट्रहित या तत्त्वांवर चालणारी संघटना असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून संघटना बळकट करण्यासाठी कार्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आगामी जिल्हा कार्यकारिणीची स्थापना, मंडळस्तरावरील संघटन विस्तार, सक्रिय व समर्पित कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देणे, उत्तर भारतीय समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटना पोहोचविणे तसेच केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभसर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली.


