अंबरनाथ नगरपालिकेच्या मागासवर्गीय समितीच्या सभापतीपदी अंबरनाथ विकास आघाडीचे नगरसेवक कबीर नरेश गायकवाड यांची निवड करण्यात आली. नुकतीच १३ जुलै रोजी नगरपालिकेच्या इतर ६ विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. तर मागासवर्गीय समितीची निवडणूक राखून ठेवण्यात आली होती. अखेर आज १७ जुलै रोजी नगराध्यक्ष तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील यांच्या पिठासीन अध्यक्षतेखाली पालिकेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात मागासवर्गीय समितीच्या सभापती पदाचा कबीर नरेश गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
अंबरनाथ नगरपालिका विषय समित्या निवडणूक प्रक्रियेत अंबरनाथ विकास समिती तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वाची सूचना केली होती. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष खींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, आमदार बालाजी किणीकर, तसेच गटनेते अभिजीत करंजुले व रवींद्र करंजुले या युतीच्या प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर कबीर गायकवाड यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी तेजश्री करंजुले-पाटील यांच्या हस्ते कबीर गायकवाड यांना मागासवर्गीय समिती सभापतीपद अधिकृतपणे प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना कबीर गायकवाड यांनी, मिळालेल्या या संधीचा वापर करून प्रभागातील आणि शहरातील मागासवर्गीय नागरिकांच्या कल्याणासाठी योग्य प्रकारे काम करणार असल्याचे सांगितले.


