‘अंबाडी तालुका’ मागणीसाठी कृती समिती आक्रमक

पडघा अप्पर तहसीलदार मुख्यालयास विरोध

भिवंडी-वाडा रस्त्या वरील मध्यवर्ती अंबाडी या ठिकाणी नव्या स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करावी, शासनाने पडघा अप्पर तहसीलदार मुख्यालय अधिसूचना रद्द करावी यासाठी पुन्हा एकदा स्थानिक भूमिपुत्र एकवटले असून अंबाडी तालुका कृती समितीच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने आंदोलन करून ही मागणी तडीस नेण्याचा संकल्प सर्व स्थानिकांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली केला आहे.

अंबाडी हे ठिकाण मध्यवर्ती असून येथून भिवंडी वाडा वसई यासोबतच वडोदरा महामार्गा मुळे नाशिक व कल्याण येथील दळणवळणाची साधने सहज उपलब्ध असून येथील दुर्गम कृषिप्रधान आदिवासी बहुल क्षेत्राला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी अंबाडी तालुका निर्मिती शासनाने तातडीने करावी अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष शरद पाटील यांनी अंबाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

यावेळी कृती समितीचे पदाधिकारी उपाध्यक्ष आर जी पाटील, मोहन पाटील, कार्याध्यक्ष विजय गायकवाड, सचिव सुदाम पाटील, सल्लागार एन वाय पाटील, श्याम भोईर, आत्माराम पाटील, केशव लाटे, प्रमुख संघटक नवसु पाटील, कोषाध्यक्ष संतोष पाटील, अजय तनपुरे उपस्थित होते. जनभावना, भौगोलिक वास्तव आणि तज्ज्ञ समितीची शिफारस डावलून केवळ राजकीय दबावाखाली पडघा अप्पर तहसीलदार कार्यालयाचा निर्णय घेतल्यास अंबाडी परिसरातील उत्तर भिवंडीतील सव्वाशे गावांमध्ये तीव्र जनक्षोभनिर्माण होईल. अशा निर्णया विरोधात लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही अंबाडी तालुका कृती समितीचे अध्यक्ष शरद पाटील यांनी शेवटी दिला आहे.

Scroll to Top