राज्यातील प्रतिष्ठित ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या २०२६-२८ या द्वैवार्षिक कार्यकाळासाठी रविवारी (दि. १९ जुलै) झालेल्या निवडणुकीत दिलीप शिंदे यांनी अध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवत संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तर कार्याध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत दीपक शेलार यांनी प्रतिस्पर्धी विकास काटे यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ ठरण्याचा मान मिळविला. खजिनदारपदी राजेश शेटकर यांनीही बिनतोड विजय नोंदवून इतिहास रचला.
ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निःष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे महापालिकेचे निवृत्त अधिकारी महेश राजदेरकर यांनी निवडणूक अधिकारी, तर प्राची डिंगणकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. प्राची डिंगणकर यांच्या संपूर्ण टीमचे बहुमोल योगदान या निवडणूक प्रक्रियेसाठी लाभले. अध्यक्षपदासाठी दिलीप शिंदे, अमोल पवार, दीपक दळवी आणि सुरेश साळवे यांच्यात चौरंगी लढत रंगली. त्यामध्ये दिलीप शिंदे यांनी ७१ मते मिळवत विजय संपादन केला. दीपक दळवी यांना ५० मते मिळाली. कार्याध्यक्षपदाच्या लढतीत दीपक शेलार यांनी ७५ मते मिळवून विकास काटे (५० मते) यांचा पराभव केला. खजिनदारपदासाठी झालेल्या मुकाबल्यात राजेश शेटकर यांनी ७७ मते मिळवत राहुल क्षिरसागर (४७ मते) यांच्यावर मात केली.
दरम्यान, उपाध्यक्षपदी निलेश मंडलिक, सचिवपदी राजीव डाके आणि सहसचिवपदी प्रसाद सकट यांची बिनविरोध निवड झाली.
कार्यकारिणी सदस्यांच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निकेश शार्दुल (२०), गजानन हरिमकर (७१), अमर राजभर (६५), सचिन देशमाने (५८), नितीन दुधसागर (५५) आणि प्रफुल्ल गांगुर्डे (५४) हे विजयी ठरले. महिला सदस्यपदासाठी सारिका साळुंखे यांनी ८६ मते मिळवत विजय मिळविला. नुतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. विशेष कौतुक : परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक, भाजपचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.


