दिवा शहरातील व्यापारी बांधवांचे प्रश्न, अडचणी, व्यवसायवृद्धी, सुरक्षा तसेच प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी दिवा व्यापारी वेल्फेअर असोसिएशन या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते उमेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेची स्थापना करण्यात आली असून दिवा शहरातील व्यापाऱ्यांना एकत्र आणण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे. संघटनेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून तिचे कार्यालय आगासन रोड, दिवा (पूर्व) येथे सुरू करण्यात आले आहे. व्यापारी बांधवांच्या विविध समस्या सोडविणे, व्यवसाय वृद्धीसाठी सामूहिक योजना राबविणे, व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे तसेच शासकीय यंत्रणांशी समन्वय साधणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
याशिवाय रस्ते, पार्किंग, वीज, पाणीपुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण यांसारख्या नागरी सुविधांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, सीसीटीव्ही आणि चोरी प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती करणे, तसेच सण – उत्सव, सामाजिक उपक्रम आणि व्यापारी हिताच्या मोहिमा राबविणे यावरही संघटनेचा भर राहणार आहे.
दिवा शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या संघटनेत सहभागी होऊन आपल्या सूचना व समस्या मांडाव्यात, तसेच व्यापारी वर्गाच्या एकजुटीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उमेश भगत यांच्या वतीने करण्यात आले आहे. दिवा शहरातील व्यापाऱ्यांना एक सक्षम आणि संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या दिवा व्यापारी वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून व्यापारी हिताच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


