‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांत नको’ या पवित्र भावनेला आत्मसात करून, संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी संत निरंकारी सत्संग भवन, साठेनगर, दिघा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ११४ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. त्याचबरोबर सुमारे १४० भक्तगणांनी रक्तदान करण्यासाठी स्वेच्छेने नोंदणी केली होती. शिबिरातील रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढी, विले पार्ले यांच्या मार्फत केले गेले. मानवसेवेची उदात्त भावना बाळगून संत निरंकारी मिशन मुंबई महानगर प्रदेशात दर आठवड्याला रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजू रुग्णांसाठी मोलाचे कार्य करत आहे. आपली सामाजिक व मानवतावादी सेवांची परंपरा निरंतर जपत मुंबई व उपनगरातील विविध ठिकाणी मिशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ निरंकारी मिशनचे कुशीनगर (उ.प्र.) येथील ब्रह्मज्ञान प्रचारक सुरेंद्रनाथ त्रिपाठी यांच्या उपस्थितीत निरंकार प्रभुच्या प्रार्थनेद्वारे करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक सेक्टर संयोजक मनोहर सावंत यांच्यासह अनेक आजी-माजी क्षेत्रीय संचालक, सेवादल अधिकारी व प्रबंधक उपस्थित होते. शिबिरात निरंकारी भक्तगण व सेवादल स्वयंसेवकांसमवेत आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनीही आपली उपस्थिती नोंदवली. मंडळाचे स्थानिक ब्रांच मुखी सोमनाथ माने यांच्या देखरेखीखाली सर्व सेवादल अधिकारी व स्वयंसेवकांच्या एकत्रित प्रयत्नाने सदर रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले.


