रुईया स्वायत्त महाविद्यालयात ‘कालिदास दिन’ साजरा

रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयात ‘दीपशिखा’ या संस्कृत विभागातर्फे कालिदास दिन साजरा करण्यात आला.

यावेळी संस्कृत अभ्यासक डॉ. मृणालिनी नेवाळकर-गोसावी यांचे ‘शास्त्रवेत्ता कालिदास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कालिदासाच्या काव्य आणि नाटकांमध्ये विविध शास्त्रे व
कला यांचे संदर्भ कसे येतात, यावर प्रकाश टाकला. तसेच कालिदासाच्या साहित्यातील निसर्ग, सौंदर्य यांचे विशेष सोप्या भाषेत पीपीटी सादरीकरणासह मुलांना उलगडून दाखवले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना व ‘गाओ रे कालिदास’ या विषय आधारित गीताने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी कालिदासाच्या साहित्यावर आधारित विविध कार्यक्रम सादर केले. मुलींनी नृत्याद्वारे कालिदासाच्या सात काव्यकृतींचे सादरीकरण केले. या कलाकृतींतून कालिदासाच्या काव्यातील प्रमुख व्यक्तिरेखांची वैशिष्ट्ये, त्यातील भावभावना, प्रमुख रस पात्रांच्या मनोगतातून सादर करण्यात आले.

यावेळी मुलांनी ‘कालिदासप्रतिभोन्मेषः’ ही नाटिका सादर केली. कालिदासाचे जीवन कसे होते, त्याच्या काव्यरचनेला सुरुवात कशी झाली आणि त्याला कालिमातेकडून प्रसाद कसा मिळाला, या सगळ्या प्रसंगांचे दृश्यमय सादरीकरण या नाटिकेतून करण्यात आले.

यावेळी कल्पित रांका या विद्यार्थ्याने कालिदासाच्या जीवनावर माहितीपट व ‘कालिदास के सप्तस्वर’ हे काव्यनाट्यही सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी धृति गाला, कल्पित रांका, ध्रुवि जैन, श्रावणी चिखलकर, पुष्टी शाह, अमृता शानभाग, वेदांती मोडक या विद्यार्थ्यांनी कालिदासाची चार मीटर लांबीची महाकाव्ये आणि नाटकांवर आधारित काढलेला चित्रपट दाखविण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी कालिदासाची स्तुती करणारे श्लोक म्हटले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख डॉ. वैशाली दाबके यांनी केले. तर डॉ. नम्रता जगताप यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

Scroll to Top