बाजारपेठेत महापूर, नागरिकांची धावपळ
शहापूर : शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे रविवारी दुपारच्या सुमारास ढगफुटीसदृश झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजविला. अवघ्या काही मिनिटांत कोसळलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आणि डोळखांबमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. रस्ते, दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि सार्वजनिक ठिकाणे जलमय झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुख्य रस्त्यांवर गुडघाभर ते कंबरेपर्यंत पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक ठप्प झाली. अनेक वाहने पाण्यात अडकून पडली, तर नागरिकांना जीव मुठीत धरून सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली.
स्थानिकांच्या मते, डोळखांबमध्ये इतक्या कमी वेळात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाला. नाले आणि गटारे क्षणार्धात तुडुंब भरून वाहू लागल्याने पावसाचे पाणी थेट बाजारपेठेत घुसले. परिणामी संपूर्ण परिसर जलमय झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, डोळखांब बाजारपेठेतील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रत्येक पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे


