वीज व असलेल्या मागण्या सोडवाव्यात यासाठी वासिंद बंद ठेवून वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे व्यापारी मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वासिंद शहर व परिसरातील अनेक गावं – पाडे येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या कार्यालयावर अवलंबून आहे. येथील वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकीकरण व औद्योगिक क्षेत्र यामुळे या वीज वितरणावर अधिक ताण पडत आहे. त्यामुळे वीज वितरण बाबत समस्या निर्माण होऊन वीज पुरवठा खंडित होत आहे. जेएसडब्लू (जिंदाल) या कंपनीच्या पाली जवळील सब स्टेशन येथून खातिवली मधील टाटा हाऊसिंग सब स्टेशनला इन्कमर सुरू व्हावे यासाठी व्यापारी मंडळाचे पदाधिकारी व काही राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न सुरू असताना येथील असलेल्या काही वीज समस्या व कांबारे येथून वासिंदसाठी स्वतंत्र इन्कमर जोडणी या प्रमुख मागणीसह इतर असलेल्या मागण्या सोडवाव्यात यासाठी व्यापारी मंडळाच्या वतीने येथील वीज वितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान, येत्या १५ ऑगस्ट पर्यंत महावितरण कंपनीकडून येथील समस्या सोडवून असलेल्या मागण्या मान्य न केल्यास १७ऑगस्ट रोजी वासिंद बंद ठेवून वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे म्हटले असून यामध्ये सर्व राजकीय, सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व नागरीकांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन व्यापारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


