शहापूर – महसूल दिनाचे
औचित्य साधून शहापूर तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना राज्याच्या महसूल विभागामार्फत उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच महसूल विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी शहापूर तालुक्यात कार्यभार स्वीकारल्यानंतर शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत महसूल प्रशासन अधिक गतिमान केले. ‘महाराजस्व स्वाभिमान’, ‘१०० दिवसांचा कार्यक्रम’, तसेच ‘१५० दिवसांचा कार्यक्रम’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून महसूल विभागाच्या कामकाजाला नवी दिशा दिली. याशिवाय, ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी शेत पाणंद रस्ते, घोंगडी बैठक, महसूल न्यायालयीन प्रकरणांचा जलद निपटारा, महसूल सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच गावपातळीवरील प्रशासकीय समन्वय वाढविणे अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात त्यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महसूल प्रशासनाबाबत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून शहापूर तालुक्याने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. कर्तव्यनिष्ठा, पारदर्शक प्रशासन, लोकाभिमुख निर्णयप्रक्रिया आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यांची दखल घेत राज्य शासनाने त्यांना उत्कृष्ट कामगिरीचा हा मानाचा पुरस्कार प्रदान केला आहे.


