आजी आणि नातू लिखित बालकादंबरीचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रतिभा कणेकर आणि त्यांचा नातू प्रत्यूष पणशीकर म्हणजे मनाआजी व मनू यांनी मिळून लिहिलेल्या ‘असलं कसलं झाड’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २ ऑगस्ट, २०२६ रोजी मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे उत्साहात पार पाडला.

हा प्रकाशन सोहळा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लेखिका मंगल कातकर, कवी व प्रकाशक गीतेश शिंदे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. कणेकर यांनी ‘असलं कसलं झाड’ या बालकादंबरीचा लेखन प्रवास उलगडून सांगितला व मराठीतली आजीनातवाने एकत्र लिहिलेली ही बहुधा पहिलीच साहित्यकृती असल्याचे सांगितले. मनोगत व्यक्त करताना लेखक प्रत्यूष पणशीकर यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी व आजीसोबत सुरू झालेला साहित्यिक प्रवास उलगडला. बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी बालसाहित्याची वैशिष्ट्ये ‘असलं कसलं झाड’ या बालकादंबरीत कशी आहेत हे गोष्टी, कवितांचे दाखले देत स्पष्ट करून सांगितले. लेखिका मंगल कातकर यांनी ‘असलं कसलं झाड’ या बालकादंबरीची थोडक्यात ओळख करून दिली व त्यातलं वेगळेपण नमूद केलं. त्याचबरोबर अद्भूततेची सफर करायला लावणारं बालसाहित्य लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला, सृजनशीलतेला पोषक असल्याने ते जास्त लिहिलं गेलं पाहिजे असं मतही मांडलं.

या बालकादंबरीचे प्रकाशक गीतेश शिंदे यांनी पुस्तकातील उताऱ्याचे अभिवाचन केले व पुस्तक प्रकाशन संदर्भातले आपले अनुभव मांडले. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध आर जे. दूरदर्शन निवेदिका मानसी आमडेकर यांनी केले.

Scroll to Top