क्रांतीदिना निमित्त ‘ओळख क्रांतीवीरांची’ अनोखी स्पर्धा संपन्न

आपल्या देशात क्रांतीवीरांचे अमुल्य योगदान आहे. आजच्या पिढीला आपल्या क्रांतीवीरांची कार्य, त्यांचे बलिदान आणि राष्ट्रप्रेम यांची ओळख व्हावी तसेच क्रांतीवीरांचे स्मरण करणे त्यांच्या त्यागाचा सन्मान करणे व त्यांचे स्मरण करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे या उद्देशाने १६२ वर्षे अविरत वाचन सेवा देणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या वतीने ‘ओळख क्रांतीवीरांची’ हा आगळा वेगळा स्पर्धात्मक कार्यक्रम क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय वायूदलातील सेवानिवृत्त अधिकारी धनंजय देशपांडे यांनी आपल्या मनोगतातून ‘ऑगस्ट क्रांतीचा इतिहास’ प्रतिपादित केला. विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम जागृत होऊन देशासाठी अभिमानाची भावना जोपासण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यापुढेही वाचनालयाच्यावतीने ‘ओळख संतमहात्म्यांची’ या स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार असल्याचा मानस वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी प्रास्ताविकेत नमूद केले. सदर स्पर्धेत गजानन विद्यालय, जे.इ.ए. हायस्कूलचे सुभेदार वाडा, शशांक विद्यालय, प्रगती महाविद्यालय (डोंबिवली) तसेच वाचनालयाच्या वाचक वर्गाने अत्यंत उत्साहात सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेत प्रथम क्र. जिज्ञासा नाईक (सुभेदार वाडा) जागृती चव्हाण (प्रगती महाविद्यालय), द्वितीय क्र. यशस्वी माळी (गजानन विद्यालय), तृतीय क्र. भाग्यश्री जोगी (सुभदार वाडा), उत्तेजनार्थ स्वरा बनसोडे (सुभेदार वाडा) तर खुल्या गटातून उज्ज्वला पाठक-प्रथम क्र, राजेश आंबवणे-द्वितीय क्र, धनंजय गोरे-तृतीय क्र, ईशान मोडक उत्तेजनार्थ, नीता लवाटे-उत्तेजनार्थ यांनी स्पर्धेत पारितोषके पटकावली.

कवयित्री तथा शिक्षिका संयुक्ता राठोड व नाटककार, दिग्दर्शक तसेच शिक्षक अजय पाटील यांनी क्रांतीवीरांचे योगदान मनोगतातून व्यक्त करून स्पर्धेचे उत्कृष्टपणे परीक्षण केले. प्रसंगी वाचनालयाचे कार्यकारणी सदस्य अरविंद शिंपी, डॉ. अमिता कुकडे, बाळकृष्ण धुरी विजयसिंह परदेशी, शिक्षक वर्ग, पालक वर्ग, ग्रंथसेविका आदि उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदर स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

Scroll to Top