भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय तिरंगा आज आपण हातात घेतला असला तरी तो आपल्या मनामध्ये आहे. भारतीय संविधानाचा सन्मान, देशाचा स्वाभिमान आणि राष्ट्रभावना आपल्या अंतःकरणात आहे. नवभारत घडविण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. ही जबाबदारी आपण पार पाडली तरच हातातील तिरंग्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल, असे गौरवोद्वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. तिरंगा यात्रा ही केवळ एक रॅली नसून देशप्रेमाची भावना जागृत करणारा उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वरळी सी फेस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ रॅलीचे उ‌द्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र मुंबईच्या महापौर रितू तावडे, सर्वश्री आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, योगेश सागर, मिहिर कोटेचा, कॅप्टन तमिळ सेल्वन, राजहंस सिंह, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मला येथे दोन सागर दिसत आहेत. एक म्हणजे समोर असलेला हिंद महासागर आणि दुसरा म्हणजे भारतीय तिरंग्याचा महासागर. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले, सैनिकांनी सीमेवर प्राणांची आहुती दिली आणि देशवासीयांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला.

तो तिरंगा जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत सदैव उंच फडकत राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Scroll to Top