बापगाव-आमणे-पडघा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात उपोषण सुरू

भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रा.मा. ८१ बापगाव-आमणे-पडघा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावरील खड्डे, खराब झालेला रस्ता आणि त्यामुळे होणारे अपघात याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमणे येथे उपोषण सुरू करण्यात आले.

‘चला, आपली समस्या आपणच सोडवूया !’ या भूमिकेतून उपोषण कर्ता कॉ. रमेश गायकवाड (सचिव) भा.का.प. ठाणे जिल्हा, जयवंत दळवी (समाजसेवक) यांनी सर्व प्रवाशांच्या वतीने हे उपोषण सुरु करण्यात आले. उपोषणासाठी उभारण्यात आलेल्या मंडपातील फलकावर रस्त्याच्या दुरवस्थेचे छायाचित्रही लावण्यात आले असून, प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता कायमस्वरूपी सुस्थितीत करावा, रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच मागील काही वर्षांत रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या खर्चाची व कामाची चौकशी करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्यावरील खड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याचे कायमस्वरूपी दर्जेदार काम करावे, अशी मागणी उपोषण कर्त्यांनी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Scroll to Top