भिवंडीत नवोदित वकिलांच्या मार्गदर्शनासाठी ‘विधी सेवा मंच’ चा शुभारंभ

सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासोबतच नवोदित वकिलांना न्यायालयीन कामकाजाचे व्यावहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने ‘विधी सेवा मंच’चा शुभारंभ शनिवारी भिवंडीत झाला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप व्ही. मारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंजूरफाटा येथील शांती चंदन ऑडिटोरियममध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी न्यायमूर्ती संदीप व्ही. मारणे यांनी ‘लॉ ऑफ पोजेशन’ अर्थात ताबा व कब्जासंदर्भातील कायद्यावर मार्गदर्शन केले. कायद्याचे पुस्तकी ज्ञानासोबतच त्याची न्यायालयीन अंमलबजावणी व व्यावहारिक बाजू समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नवोदित वकिलांनी सुरुवातीच्या काळात आर्थिक उत्पन्नापेक्षा अनुभव, ज्ञान आणि न्यायालयीन प्रक्रियेचे आकलन यांना प्राधान्य द्यावे, असा संदेश देण्यात आला. वरिष्ठ वकिलांकडून मार्गदर्शन, प्रकरणांची तयारी आणि युक्तिवादाचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी मंच उपयुक्त ठरणार आहे. कार्यक्रमास ऍड. हर्षल पाटील व ज्येष्ठ अधिवक्ता ऍड. विजय आगाशे उपस्थित होते. मंचचे अध्यक्ष ऍड. विशाल केशव भोईर, सचिव ऍड. पंकज मंगेला व खजिनदार ऍड. समीर शरद पाटील, ऍड. शिरीष बोरकर, ऍड. अजय पाटील, ऍड. सुनिल टावरे, ऍड. विशाल पाटील, ऍड. सुरेश मते, ऍड. स्मिता चिपळुणकर, ऍड. वैभव
पाटील, ऍड. अरविंद शर्मा यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवाजीराव एस. जोंधळे इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँड रिसर्च, आसनगावच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा एकनाथ सुर्वे व विघ्नहर्ता ट्रस्ट, शिवाजीराव एस. जोंधळे नॉलेज सिटी, आसनगावच्या सचिव डॉ. स्नेहा जोंधळे आणि जॉईंट सेक्रेटरी हर्ष जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

Scroll to Top