सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गेली १८ वर्षे केलेले कार्य तसेच पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत दैनिक महाराष्ट्र सम्राटचे संपादक व रोजगार-स्वयंरोजगार मार्गदर्शक गणेश चंद्रकांत भोईटे यांना ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ‘ठाणे गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते गणेश भोईटे यांना पुरस्काराचे मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
गणेश भोईटे गेल्या १६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, ठाणे शहर व परिसरातील नागरी, सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांना त्यांनी सातत्याने आपल्या वृत्तांकनातून वाचा फोडली आहे. पाणीपुरवठा, वाहतूक, नागरी सुविधा, पुनर्विकास, रोजगार, सामाजिक प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांना त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून सातत्याने स्थान दिले.
पत्रकारितेबरोबरच सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी दीर्घकाळ केले आहे. विविध स्पर्धा परीक्षा, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधींबाबत युवकांना मार्गदर्शन करताना अनेक विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी केले. विशेषतः आर्थिकदृष्ट्या अडचणीतील विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन व शैक्षणिक सहकार्य देण्यावरही त्यांनी भर दिला आहे.
गणेश भोईटे यांचा ‘ठाणे गौरव’ पुरस्काराने सन्मान



