पारसिक हिल परिसरात उपमहापौर दशरथ भगत यांच्या उपस्थितीत स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

उपमहापौर दशरथ भगत यांच्या उपस्थितीत स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सर्व घटकांना सोबत घेऊन विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात येत असून पारसिक हिल येथे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत झालेल्या ‘एक दिन – एक घंटा – एक साथ’ या अभिनव उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण मोहीमेत दोनशेहून अधिक तृतीयपंथी नागरिक आणि 75 एनएसएस विद्यार्थी सहभागी होत असल्याबद्दल उपमहापौर दशरथ भगत यांनी स्वच्छतेविषयी जागरूक असणाऱ्या शहरावर प्रेम करणाऱ्या सहभागी घटकांचे कौतुक केले.
17 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत श्रीविश्वनाथ महाराज समाधी मंदिर परिसरात आयोजित स्वच्छता व वृक्षारोपण मोहीमेप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना उपमहापौर यांनी आपल्या शरीराच्या स्वच्छतेची जशी काळजी घेतो तशी काळजी शहराच्या स्वच्छतेची घेतली तर शरीर निरोगी राहील अशा शब्दात उपस्थितांशी संवाद साधला. शहर स्वच्छतेविषयीची आपली सामाजिक जबाबदारी मनात घट्ट करणारे ‘सुगंधी अंगण अभियान’ हा प्रत्येकाचा सेवाभाव वाढविणारे असून त्यामध्ये तृतीयपंथी नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी उपमहापौर श्री. दशरथ भगत यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, बेलापूरचे सहा. आयुक्त प्रशांत नेरकर, मुख्य स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर, स्वच्छता अधिकारी पवन कोवे, -स्वच्छता निरीक्षक विजय नाईक, संजय पाटील, महेश मोरे, रत्नमाला नाईक, एनएसएसचे मुख्य समन्वयक डॉ. दीपक पोखरकर, लेट्स सेलिब्रेट फिटनेसच्या प्रमुख श्रीम. रिचा समित आणि किन्नर माँ सेवाभावी ट्रस्टचे 200 हून अधिक तृतीयपंथी सदस्य व स्टर्लिंग कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे 75 एनएसएस विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होते. याप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपले नवी मुंबई शहर देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकित शहर असून हे मानांकन उंचाविण्यासाठी या क्षेत्रात आपण सातत्यपूर्ण अधिक काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. नवी मुंबई शहरातील तृतीयपंथी नागरिकही स्वच्छता आणि पर्यावरणासारख्या सेवाभावी कामात पुढाकार घेऊन सहभागी होतात हे आपल्या शहराचे वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले.

Scroll to Top