फ्लॅश मॉबच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानात संगीतमय स्वच्छता जनजागृती

फ्लॅश मॉबच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानात संगीतमय स्वच्छता जनजागृती

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ हे महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांच्या माध्यमातून राबविले जात असताना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेंतर्गत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
आता नव्याने घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 लागू झाले असून त्यानुसार यापूर्वीच्या ओला आणि सुका अशा दोन प्रकारच्या कचरा वर्गीकरणामध्ये आता घरगुती घातक कचरा आणि स्वच्छताविषयक सॅनिटरी कचरा यांची भर पडलेली आहे. त्या अनुषंगाने आता 4 प्रकारे कचरा वर्गीकरण करावे याविषयी विविध माध्यमांतून लोकजागृती करण्यात येत आहे.
असाच एक अभिनव उपक्रम मॉल्समध्ये संध्याकाळी नागरिक कुटुंबियांसमवेत मोठ्या संख्येने खरेदीसाठी जातात हे लक्षात घेत सीवूडच्या नेक्सस ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये फ्लॅश माँबसारख्या आधुनिक संगीतमय नृत्य प्रकाराव्दारे प्रभावीपणे सादर करण्यात आला. मॉलमध्ये नेहमीचे गर्दीचे वातावरण व नागरिकांमध्ये खरेदीची लगबग सुरू असताना अचानक श्रवणीय असे आकर्षित करून घेणारे संगीत वाजायला लागते. हा गाण्यांचा आवाज कुठून येतोय हे बघण्यासाठी लोक त्या दिशेने वळतात, तर त्यांना मॉलच्या मध्यभागी 80 हून अधिक युवक-युवतींचा समूह हा ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेचे स्वच्छताविषयक आवाहन करणारे फलक उंचावत नृत्य करताना दिसतो. बघता बघता हे नृत्य पाहण्यासाठी त्यांच्या भोवताली गर्दी जमू लागते. मॉलमधले सर्वच नागरिक वेगवेगळ्या मजल्यांवरून ग्रीलच्या कठड्याजवळ येऊन खालच्या पॅसेजमधल्या नृत्याविष्काराला दाद देऊ लागतात. तरूणाईचे कॅमेरेही हा संगीतमय नृत्याविष्कार रिल्समध्ये टिपण्यासाठी कॅमेरा धरून चित्रीकरण करू लागतात.
आरंभ क्रिएशन्सचा 80 कलावंतांचा नृत्यसमुह लोकप्रिय गाण्यांच्या माध्यमातून तसेच खास ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानासाठी तयार केलेल्या गीतांच्या माध्यमातून कचरा वर्गीकरण व स्वच्छतेविषयी आवाहन करू लागतो. त्याला नागरिकांचा उत्साही प्रतिसादही लाभतो.

Scroll to Top