विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे; केडीएमसीचा महिनाभराचा प्रशिक्षण उपक्रम

केडीएमसीचा महिनाभराचा प्रशिक्षण उपक्रम

तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करण्यासोबतच विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत ‘व्यसनमुक्त भारत’ जनजागृती अभियान आणि विद्यार्थिनींसाठी कराटे-मार्शल आर्ट स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या अभियानांतर्गत सुभेदारवाडा महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थिनींना कराटे आणि मार्शल आर्टच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करता यावे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण व्हावे, तसेच त्या शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, हा प्रशिक्षणाचा उद्देश आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या उपआयुक्त कांचन गायकवाड, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, सहायक आयुक्त ढवळू चौरे, मुख्याध्यापक सागर धामोडे, वूमन्स वेलफेअर फाऊंडेशनच्या संचालिका मिनाक्षी उज्जैनकर, कराटे प्रशिक्षकांची टीम तसेच समुपदेशकांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हा प्रशिक्षण उपक्रम महिनाभर सुरू राहणार असून कल्याण आणि डोंबिवली विभागातील प्रत्येकी ३०० विद्यार्थिनींना कराटे-मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि सर्वांगीण विकास साधणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

Scroll to Top