१०व्या राष्ट्रीय वरिष्ठ गतका चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी

१०व्या राष्ट्रीय वरिष्ठ गतका चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील प्रसिद्ध शेरे काश्मीर इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये नुकत्याच झालेल्या १० व्या राष्ट्रीय वरिष्ठ गतका चॅम्पियनशिपमध्ये असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्राच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण चार पदके पटकावली.
या स्पर्धेत रविराज चकाले आणि रुपाली चकाले यांनी ‘इंडिव्हिज्युअल सिंगल सोटी’ प्रकारात चमकदार कामगिरी करत प्रत्येकी रौप्यपदक मिळवले. भाऊ-बहीण असलेल्या या दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत पदकांची कमाई केली. तन्मयी पाटील हिने ‘फरी सोटी इंडिव्हिज्युअल’ प्रकारात कांस्यपदक मिळवले. तर अदिती चंदने हिने ‘इंडिव्हिज्युअल डेमो’ प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत कांस्यपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या खेळाडूंना असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्राच्या सचिव प्रा. आरती चौधरी आणि रोहन पवार यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
महाराष्ट्राच्या या कामगिरीबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चौधरी, उपाध्यक्ष अश्विनी महांगडे तसेच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंचेही कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या चार पदकांमुळे राष्ट्रीय गतका स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली छाप उमटवली असून, राज्यातील गतका खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेला आणि खेळाडूंच्या मेहनतीला या यशामुळे प्रोत्साहन मिळाले आहे.

Scroll to Top