पोलिस उपनिरीक्षक स्नेहा कर्नाळे यांना फिटनेस आयकॉन पुरस्कार
नवरात्रोत्सवच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि फिटनेसचा संदेश देण्यासाठी ठाण्यात शनिवारी ‘नवदुर्गा वेलनेस सायकल राईड २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र, ठाणे आणि आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राईडमध्ये लहान मुले, महिला, पुरुष सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. वय हा फिटनेसच्या आड येणारा अडथळा नाही, तर इच्छाशक्ती आणि सातत्याच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या महिला बॉडीबिल्डर आणि पोलीस उपनिरीक्षक स्नेहा कर्नाळे यांनी दिला. त्यांना आम्ही Cycle प्रेमी फाऊंडेशनच्या “फिटनेस आयकॉन २०२६” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तुळजाभवानी मंदिरापासून राईडला सुरुवात झाली. सहभागी सायकलस्वारांना पदक देण्यात आले. कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्या पोलीस उपनिरीक्षक आणि आंतरराष्ट्रीय महिला बॉडीबिल्डर स्नेहा कर्नाळे यांनी आपल्या फिटनेस प्रवासातून उपस्थितांना प्रेरणा दिली. वयाच्या ५४ व्या वर्षीही क्रीडा क्षेत्रात सक्रिय असलेल्या कर्नाळे यांनी बॉडीबिल्डिंगमध्ये यश कसे मिळवले याचा प्रवास उलगडला. खेळ आणि फिटनेस क्षेत्रात महिलांनी अधिकाधिक पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्राचे प्रमुख आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किरण नाकती यांनी
राईडमध्ये सहभागी झालेल्यांचे कौतुक केले. मुलांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले.
फिटनेससाठी अशा उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. देवीचरणी प्रार्थना करूया की दुष्काळग्रस्त परिस्थिती दूर होवो आणि समाजातील विकृत मानसिकता नष्ट होऊन सर्वत्र सकारात्मकता नांदो,’ असे नाकती यांनी सांगितले.



